मुंबई: पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित संपर्कात असलेल्या राज्यभरातील ११२ जणांची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी चौकशी केली. सकाळी सात वाजेपासून एटीएसच्या १४ प्रादेशिक युनिट्समधील ५८ पथकांनी एकाच वेळी कारवाई करत १५० ठिकाणी छापेमारी केली. ही कारवाई पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी कथित संबंध असलेल्या सोशल मीडिया नेटवर्कच्या तपासाचा भाग आहे.
शहजाद भट्टी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम व व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय तरुणांशी संपर्क साधून विघातक कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय आहे.
या नेटवर्कमध्ये आबिद जाट ऊर्फ आबिद छल, अजमल गुजर, हम्माद मेमन, राणा हुसेन, अशरफ बशीर आलम यांच्यासह अन्य काही पाकिस्तानस्थित हँडलर्सचा सहभाग असल्याचाही तपास सुरू आहे. यापूर्वी मे महिन्यात भट्टीच्या नेटवर्कविरोधात ५७ संशयितांची चौकशी केली होती.
२०० हून अधिक सोशल मीडिया खाती रडारवर
महाराष्ट्रातील विविध शहरांतील २०० हून अधिक सोशल मीडिया प्रोफाइल एटीएसच्या रडारवर आहेत. या व्यक्तींनी पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप खात्यांवरील पोस्टवर ङ्गलाइकफ, ङ्गकमेंटफ किंवा इतर प्रकारे संवाद साधल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रोफाइलची पडताळणी सुरू असून त्यापैकी ११२ जणांची शुक्रवारी चौकशी करण्यात आली.
धार्मिकदृष्ट्या संवेदनशील विषयांचा आधार घेऊन तरुणांचे कट्टरपंथीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे तपासात समोर आले आहे. बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा देशविघातक कारवायांसाठी वापर, गुप्त माहिती गोळा करणे, अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रांची वाहतूक आणि स्थानिक पातळीवर स्लीपर सेल उभारण्याचे प्रयत्न या नेटवर्कमार्फत होत असल्याचा संशय एटीएसला आहे.
मराठवाडा-विदर्भासह नाशिक, सांगली येथे कारवाई
- छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांतही छापेमारी करण्यात आली. यात १३ संशयितांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- एटीएसने नागपूरमधून ४, चंद्रपूरमधून ३, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा येथून प्रत्येकी १ अशा एकूण १० संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. तसेच, सांगली आणि नाशिक येथेही छापे टाकले.
मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवा
सोशल मीडियावरील अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींशी संपर्क टाळावा, मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवावे, संशयास्पद आर्थिक ऑफर किंवा नोकरीच्या आमिषांना बळी पडू नये, देशविघातक संदेश फॉरवर्ड करून नयेत, असे आवाहनएटीएसने केले आहे.